डॉ आंबेडकर कृतीशील साकारणारे मराठी व्यक्तीमत्व भारताचे पंतप्रधान व्हावेत- सादिक खाटीक
थोरांचे विचार सांगणारे आणि खेळाला महत्व देणारे व्यासपीठ राजारामबापू ने उभारावे – राजेंद्र खरात
महामानवांच्या विचार आणि खेळासाठी प्रतिदिनी उपक्रम राबविणार – सुरज पाटील

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज- भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर कृतीशील वाटचाल करणारे महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तीमत्व ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा मोठा गौरव होईल. अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनानिमित्त आटपाडीतील राजारामबापू हायस्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आरपीआय आठवले गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात तर अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा.चेअरमन सुरज पाटील हे होते . त्यावेळी सादिक खाटीक बोलत होते .
सर्व क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या आणि जगमान्यता मान्यता लाभलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना आणखी २० वर्षाचे वाढीव आयुष्य लाभले असते आणि या कालावधीसाठी ते भारताचे पंतप्रधान झाले असते तर भारत त्या दोन दशकातच जगाची महासत्ता बनला असता पण हे घडू शकले नाही हे भारताचे दुर्देव होते.पहिली ते पदवीपर्यतच्या शिक्षणात महामानवांच्या संस्कारक्षम विचारांची शिदोरी प्रत्येक विद्यार्थ्याला सातत्याने मिळावी यासाठी आठवड्यातील काही तास राखीव करावेत . राजेंद्र खरात यांची खेळ आणि संस्कारा संदर्भातली सुचना रास्त आहे.राजारामबापू प्रशालेने याबाबतीतला उपक्रम सुरू करून देशात पहिले ठरावे,असे मतही सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
डॉ बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मानवांच्या विचारांचे संस्कार विद्यार्थ्यांत रुजवण्यासाठी आणि व्यक्तीमत्व विकासासाठी राजारामबापू हायस्कूल ने आपल्या अभ्यासक्रमाच्या नियोजनात यासाठी काही तासांचा वेळ उपलब्ध करून द्यावा अशी सुचना करून आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्या वर प्रकाश टाकला.
येत्या जुन पासून खेळ आणि थोरामोठ्यांच्या विचारधनाला विद्यार्थ्यांपर्यत पोहचणारी खास व्यवस्था राजारामबापू प्रशालेत प्रतिदिनी अंमलात आणू अशी घोषणा श्री . भवानी शिक्षण संस्थेचे व्हा चेअरमन सुरज पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केली .
प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन,पुष्पहार अर्पण,दीप प्रज्वलन राजेंद्र खरात व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी माजी मुख्याध्यापक टी डी चव्हाण सर,एस एस कदम सर,ए ए जाधव सर, आय जी मुलाणी सर, सौ एम एस कोरवी मॅडम , सौ एस एस भोसले मॅडम,एस बी पाटील सर, सौ आर एस खंदारे मॅडम आदी उपस्थित होते .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा गौरव करणारे प्रशालेचे मुख्याध्यापक माणिकराव साळुंखे यांचे भाषण झाले.सुत्रसंचालन गणेश ऐवळे यांनी केले.आभार महादेव देवकर सर यांनी मानले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
