पंढरीतील मठ,मंदिरे,समाधी स्थळे ही काय अतिरेकी अड्डे आहेत का ?
ही धार्मिक स्थळे उध्वस्त करू पाहणारा कॉरिडॉर स्ट्राइक कशासाठी ?
कॉरिडॉर निमित्ताने प्रशासनाकडून सर्वेक्षणास प्रारंभ प्रारंभासच जनक्षोभाने घेतली उसळी – प्रा.अशोक डोळ
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०५/२०२५ – दर्शन,भजन, कीर्तन प्रवचन,नामस्मरणासह ईश्वरचिंतनासाठी कायम वापरात असणारे ही धार्मिक स्थळे आज कॉरिडोरच्या निमित्ताने जर उध्वस्त होणार असतील तर ही धार्मिक स्थळे म्हणजे काही अतिरेकी अड्डे आहेत काय ? ज्या कॉरिडॉरमुळे कदाचित ही धार्मिक स्थळे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे आणि जर का कॉरिडोरच्या निमित्ताने ही धार्मिक स्थळे उध्वस्त होणार असतील तर या धार्मिक स्थळांवर हा कॉरिडोर रुपी स्ट्राइक कशासाठी ? अशी संतप्त भावना पंढरीच्या बाधित जनतेसह वारकरी भाविकांत निर्माण झाल्याचे बोलले जाते.
पंढरीत येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा देण्याच्या निमित्ताने नेते मंडळीचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा कॉरिडॉर. ज्या कॉरिडोरचा अधिकृत आराखडा अजूनही अधिकृतरित्या प्रशासना कडून जाहीरपणे जनतेस दाखविण्यात आलेला नाही,सांगण्यात आलेला नाही. प्रशासनाच्यावतीने केवळ पंढरपूरचा डीपी प्लॅन सार्वजनिक करण्यात आला आहे. पण प्रशासनाद्वारे कथित कॉरिडॉर बाबत कोणताही अधिकृत आराखडा जनतेसमोर अजूनही आलेला नाही. मंदिर परिसरातील 60,80,100 मीटर पर्यंतच्या इमारती बाधित होणार असल्याचे बोलले जाते, पण अधिकृतपणे नक्की किती मीटरपर्यंतचा भाग बाधित होणार आहे. हे मात्र प्रत्यक्ष आराखड्याच्या द्वारे दाखविले जात नाही. सध्या साठ मीटर प्रमाणे सर्वे होत असून या सर्वेक्षणाला गुरुवारी प्रारंभ झाला आहे. जर याप्रमाणे कॉरिडॉर होणार असेल आणि त्या निमित्ताने पाडापाडी होणार असेल तर यामध्ये संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर महाराज मठ त्यासमोर असणारे जैन मंदिर, महादेव आणि श्री विठ्ठलाचे श्रेष्ठ भक्त श्री.संत नरहरी महाराज सोनार समाधी मंदिर, त्यासमोर असणारे खंडोबा मंदिर, त्यालगत असणारे श्री.संत नरहरी महाराज यांनी ज्या महादेवाची आयुष्यभर उपासना केली ते मल्लिकार्जुन महादेव मंदिर,श्री. विठ्ठलाचे परमभक्त श्री.प्रल्हाद महाराज बडवे समाधी स्थळ,काळभैरव मंदिर,रेणुका माता मंदिर,महाद्वार घाटा जवळील सोमेश्वर महादेव मंदिर,अमृतेश्वर मंदिर,पश्चिम द्वारला असणारा ताकपिठे विठोबा,अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ऐतिहासिक असा होळकर वाडा आणि त्या होळकर वाड्यामध्ये स्थापित केलेले श्री.राम मंदिर त्यासमोर असणारा ऐतिहासिक असा शिंदे सरकार वाडा व त्यात स्थापित असणारे श्रीकृष्ण मंदिर, त्यालगत असणारे मंदिर समितीच्या ताब्यातील सोमेश्वर महादेव मंदिर ,बांगड धर्मशाळा,अकरा रुद्र मारुती,शाकंभरीदेवी मंदिर,जालनापुरकर महाराज मठ व परिसरात पिढ्यान पिढ्या पौर्वात्य,यजमान कृत्याच कार्य करणारे आणि पिढ्यान पिढ्या पंढरीला येणाऱ्या भाविकांना तात्पुरत्या निवासाची व्यवस्था देणारे मंडळींची घरे जिथे भाविक दर 15 दिवसाच्या एकादशीला येऊन निवास करीत असतात आणि तेथेच भजन, नामस्मरण करत आले आहेत. या सर्वांचे काय होणार ? याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती नसल्यामुळे वारकरी भाविक व विस्थापितांच्यात संतापाची भावना असून मठ, मंदिर व समाधी स्थळे ही काय अतिरेक्यांचे अड्डे आहेत काय ? म्हणून या धार्मिकस्थळांना उध्वस्त करू पाहणारा हा कॉरिडॉररुपी स्ट्राइक केला जातो आहे . अशी संतापाची भावना बाधितांतून खाजगीत व्यक्त होताना दिसत आहे. आणि याहीपेक्षा अधिक विस्तार झाल्यास आणखी काही फडकरी,दिंडेकरी,मठकरी यांच्यावरसुद्धा ही कुर्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.एकीकडे ऐतिहासिक पौराणिक व जुन्या वास्तूंचे, मंदिरांचे जतन व संवर्धन करायचे असताना या जुन्या, पुराण्या मठ, मंदिर समाधी स्थळ वास्तूंचे नेमके काय होणार? असा संभ्रम पंढरीतील जनता, भाविक व वारकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे.भाविकांना सोयीसुविधा देण्याच्या निमित्ताने निर्माण होऊ पाहणारा नेते मंडळींचा ड्रीम प्रोजेक्ट कॉरिडॉर ! या कॉरिडॉर निमित्ताने पंढरीत सुरू झालेल्या सर्वेक्षणाच्या प्रारंभीच जनप्रक्षोभ उसळला असून या जनप्रक्षोभाचा सामना सर्वेक्षणाला आलेल्या लोकांना करावा लागत आहे.

पंढरपूर येथील केबीपी कॉलेज सभागृहात दि.एक व दोन मे रोजी जनसंपर्क करून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित लोकांशी संवाद साधत त्यांच्याकडून लेखी व तोंडी मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि यानंतरचे पुढचे पाऊल म्हणून संबंधित भागातील सर्वेक्षण करण्याचे त्यांनी निश्चित केले व त्यानुसार संबंधित भागातून स्पीकरवरून जाहीर सूचनाही देण्यात आली.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपर्क केल्यापासून पंढरीतील बाधित लोकांनी मिटींगचे सत्र सुरू केले आहे.संबंधित विषयानुसार ना पंढरपूरकरांनी कॉरिडोर ची मागणी केली ना वारकऱ्यांनी कॉरिडोर ची मागणी केली! तेव्हा अशा आपल्यावर लादला जाणाऱ्या या कॉरिडोरला तोंड देण्यासाठी आपण कोणत्या प्रकारे
लढा द्यावयाचा याच्यावर विचार होऊ लागला आहे.जनतेला विश्वासात घेऊन काम केले जाणार असे शासन आणि प्रशासन म्हणत असतानाही आपली फसगत होत असल्याची भावना आता संबंधितांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जनतेचे मत जाणून घेतले जात असतानाच कॉरिडरच स्वरूप, आराखडा कुठल्याही प्रकारे आहे हे अधिकृतपणे जनतेला न सांगता प्रशासन आपली कामे पुढे रेटू पाहत असल्याची भावना बाधितांमध्ये बळावलेली आहे. यामुळे जनतेला एक प्रकारे मानसिक त्रास होत आहे.या येऊ पाहणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी कॉरिडोरला विरोध करणे हा एकच उपाय असे म्हणत सर्व प्रकारचे प्रयत्न करण्याची तयारी आता जनतेतून झाली असल्याचे दिसते.
यात न्यायालयीन लढाई लढण्यासोबतच अगदी रस्त्यावर उतरून विरोध करण्यासंबंधीचा मानस दिसत आहे. यातूनच सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील मनोहर शेट्टी यांच्याकडून त्यांनी सल्ला घेतला असून न्यायालीन लढाई लढण्याची तयारी दिसून येत आहे. तसेच माजी खासदार व नामवंत वकील सुब्रमण्यम स्वामी यांचा आधार मिळण्याच्या शक्यतेमुळे बाधितांच्या अशा काहीशा पल्लवीत झाल्या आहेत.
गुरुवार दि. 8 मे रोजी या सर्वेक्षणाच्या निमित्ताने संबंधित विभागात नगरपालिका कर्मचारी व केबीपी कॉलेजचे काही विद्यार्थी आले असता त्यांच्यासमोरच काही भागात स्पीकर वरून नो कॉरिडॉर!, एकच जिद्द कॉरिडॉर रद्द! अशा घोषणा देण्यात आल्या, तर आम्हाला कॉरिडोर नको! आम्हाला कॉरिडॉर नको असल्या कारणाने आम्ही कोणतीही माहिती देणार नाही !अशा प्रकारची भावना आलेल्या कर्मचाऱ्यांच्या समोर संबंधित विभागातील काही लोकांनी व्यक्त केली आहे तर काही लोकांनी योग्य प्रकारे आपली माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची भावनाही दाखवली आहे.
वास्तविक पाहता प्रशासनाने गर्दीचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे.या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी चंद्रभागा नदीपलीकडे 65 एकरात यात्रा काळात चांगली व्यवस्था देऊन पंढरपूर येथील यात्रा काळातील गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याचा चांगला प्रयत्न साधला आहे. त्याला चांगले यश येत असतानाच आज उलट कॉरिडोरच्या निमित्ताने अगदी विठ्ठल मंदिरा भोवतीच आम्ही गर्दीचे केंद्रीकरण करणार आहोत काय? अशा प्रकारचा प्रश्न आता जाणकार पंढरपूरकरांमधून विचारला जात आहे. खूप वर्षापासून अतिरेक्यांच्या भीतीने व मंदिर सुरक्षेच्या निमित्ताने महाद्वार घाटावरून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर महाद्वार चौकी येथे बॅरेकेटिंग टाकून मंदिराकडे येणारे रस्ते वाहनांसाठी बंद ठेवण्यात आले आहे तर पश्चिम द्वार भागाकडून मंदिराकडे येणारा रस्ता चौफाळा येथील भागात मंदिराकडे जाणारी वाहने थांबवण्यासाठी बॅरिकेटिंग टाकण्यात आले आहेत व खास यासाठी पोलीस व्यवस्थाही देण्यात आली आहे. तसेच स्वामी यांच्या किराणा दुकानापाशी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी लोखंडी बार जमिनीत रोवले आहेत व रस्ता वाहनांसाठी बंद केलेला आहे. असे असताना कॉरिडोर च्या निमित्ताने जर मंदिराभोवती दोन्ही बाजूस सुमारे 60 मीटर रुंदी झाली तर एवढ्या मोठ्या जागेतून मंदिराकडे जाणाऱ्या वाहनांची खबरदारी घेत असताना सुरक्षेच्या दृष्टीने यापेक्षा अधिक काळजी घ्यावी लागेल व तशी योजना करताना मनुष्यबळ वाढवावे लागेल ही गोष्ट नाकारून चालणार नाही. पंढरीत येणाऱ्या भाविकांची सोय या निमित्ताने नेतेमंडळी, पुढारी यांचा ड्रीम प्रोजेक्टमुळे पंढरीतील शेकडो लोकांचे संसार व पंढरीतील मठ, मंदिर समाधी स्थळात लाखो भाविक वारकऱ्यांच्या गुंतलेल्या भावना तर उध्वस्त होणार नाहीत ना याची काळजी शासन व प्रशासनाने घ्यावी अशी भावना जनतेतून उमटत आहे.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
