उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची इंदोर महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा,स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची इंदोर महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा; स्वच्छता मॉडेलचा घेतला आढावा

इंदोर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० एप्रिल २०२५ : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज इंदोर महानगर पालिका महापौर पुष्यमित्र भार्गव,आयुक्त शिवम वर्मा यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान त्यांनी इंदोरच्या पर्यावरणपूरक आणि स्वच्छता विषयक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी इंदोरच्या भूमीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यभूमी म्हणत त्यांना प्रथम प्रणाम केला आणि या शहराशी असलेले आपले आत्मीय नाते व्यक्त केले.

महापौर ॲड.भार्गव यांचे शिक्षण पुणे आणि मुंबईत येथे झालेले आहे.ॲडव्होकेट जनरल म्हणून देखील त्यांनी काम केलेले असून त्यांचा सायबर क्राइममध्ये अभ्यास आहे. त्यांना कायद्याच्यासंदर्भात अधिक काम करायचे असल्यांबाबत देखील भार्गव यांच्यासमवेत चर्चा झाली असल्याचे डॉ.गोर्हे यांनी सांगितले.त्याचबरोबर मध्यप्रदेशात लाडक्या बहिणी संदर्भात काय-काय फरक झाला याबाबत देखील काम करण्याबद्दल चर्चा झाली. महापौर भार्गव आणि आयुक्त वर्मा यांच्या भेटीतून एमएमआर आणि महाराष्ट्र, वेगवेगळ्या महापालिकांंबरोबर काय काम करता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटीचा अहवाल देत पाठपुरावा डॉ. नीलम गोर्हे करणार आहेत असे त्यांनी सांगितले.

इंदौरने पर्यावरणाच्या दृष्टीने केलेल्या प्रगतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.इंदौरमध्ये 6 प्रकारचा कचरा,ओला (अन्न कचरा),सुका (कागद, कापड, पुठ्ठा), पॉलिथिन/प्लास्टिक कचरा, ई-कचरा, घरगुती धोक्याचा कचरा (तुटलेला बल्ब/लाइट/काच) आणि जैव-वैद्यकीय कचरा (सॅनिटरी नॅपकिन, डायपर) हा वेगळा करण्याची पद्धत इंदौर येथील नागरिकांमध्ये रुजवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र देखील हे केले जाते पंरतु याच्या अंमलबजावणीवर भर देण्याची गरज असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. भारत स्वच्छ मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून इंदोरने ज्या प्रकारे देशभरात आदर्श निर्माण केला आहे, त्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी इथे येऊन अभ्यास करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

सध्या महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासोबत काम करत असल्याचा उल्लेख करत त्यांच्या अनुभवाचा उपयोग पुणे,मुंबई एमएमआर क्षेत्र,जळगाव,नाशिक अशा शहरांमध्ये करता येईल,असेही त्यांनी नमूद केले.

इंदोर महापालिकेने केलेल्या सादरीकरणात डॉ. गोऱ्हे यांनी तीन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले.पहिला म्हणजे शहरातील घनकचऱ्याचे काटेकोरपणे वर्गीकरण करण्यात येत आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे.दुसरा मुद्दा म्हणजे इथे महापालिकेला झाडे लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो आणि त्या माध्यमातून हरित प्रकल्प उभारले जात आहेत. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, इंदोर महानगरपालिकेने लोकांचा सहभाग घेत यांत्रिकीकरणा च्या मदतीने संपूर्ण व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे उभे केले आहे.

हे मॉडेल केवळ इंदोरपुरते मर्यादित न ठेवता त्याचा अभ्यास करून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी सामाजिक इच्छाशक्ती आवश्यक असून ती आपल्याकडे निश्चितपणे आहे,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading