धार्मिक पर्यटनाला चालना देण्यास तुळजापूर -पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा –उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यास तुळजापूर -पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा –उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

तुळजापूर पुनर्विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा

मुंबई,दि.१८ मार्च २०२५:धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पुनर्विकास व तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह पंढरपूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थस्थळांचा समावेश असलेला धार्मिक कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

यासंदर्भात झालेल्या बैठकीस आमदार राणा जगजितसिंह पाटील,धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे,पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी दूरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास करताना भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करावे. यामध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा,ड्रेनेज,पाणीपुरवठा आणि विद्युत वितरण व्यवस्थेचा समावेश करावा.

तुळजापूरच्या धार्मिक परंपरांचा विचार करता,जोगते,भोपे,भुते आणि कडकलक्ष्मी या पारंपरिक भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवास तयार करण्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी सुचवले. देवीच्या साड्या, दागिने आणि दानातील वस्तू यांची मोजणी सुयोग्य पद्धतीने व्हावी, असे त्यांनी सांगितले.

तुळजाभवानी मातेच्या ऑनलाईन दर्शनासाठी विशेष सुविधा

शिर्डीच्या साईबाबा मंदिर आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मातेच्या ऑनलाईन दर्शनाची सोय चॅनेलद्वारे उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली.

विकास आराखड्यासंदर्भात उच्चस्तरीय समितीची बैठक

तुळजापूर पुनर्विकास आराखड्यामुळे मंदिर परिसराच्या विकासाबरोबरच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला गती मिळेल.तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट -गाणगापूर धार्मिक कॉरिडॉर उभारल्यास भाविकांना अधिक चांगल्या सोयी उपलब्ध होतील आणि या तीर्थस्थळांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळेल,असेही उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विकास आराखड्याची माहिती देताना सांगितले की,मुख्य सचिवांच्या अध्यक्षते खालील उच्चस्तरीय समितीमध्ये या आराखड्याचे सादरीकरण झाले असून, लवकरच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल.स्थानिक नागरिक आणि पुजारी मंडळाच्या सहकार्याने हा आराखडा प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुरातत्व विभागाच्यावतीने विकासकामांना गती

तुळजापूर मंदिर परिसराच्या संवर्धनासाठी ५८ कोटी ११ लाख रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे यांनी सांगितले.पुढील टप्प्यात मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवून, कुंडांचे सौंदर्यीकरण आणि मंदिर संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत.

तुळजापूर मंदिर व परिसराच्या पुनर्विकासा साठी ३५० कोटी रुपये भूसंपादनासाठी लागणार आहेत.नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल व दोन वर्षांत संपूर्ण विकास आराखड्याची पूर्तता होईल,अशी माहिती बैठकीत देण्यात आली.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading