पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार

पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेत शाखाधिकाऱ्याने केला ९ कोटी रुपयांचा अपहार

शाखा व्यवस्थापक अमित देशपांडे यांचे विरोधात गुन्हा दाखल

बारामती/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि.पंढरपूर या बँकेत सुमारे ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार केला आहे.अमित प्रदीप देशपांडे रा.गुरुसदन हौसिंग सोसायटी, बारामती या शाखाधिकाऱ्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी बँकेच्या पंढरपूर येथील मुख्य शाखेचे व्यवस्थापक कृष्णकुमार पुरुषोत्तम पेंडाल यांनी सदरची फिर्याद दिली आहे.

पंढरपूर बँकेच्या संपूर्ण राज्यात ३० शाखा आहेत.बारामती येथे भिगवण रस्त्यावर जळोची येथेही एक शाखा आहे.तेथे अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करत आहेत. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी ताळेबंद पत्रकाचे अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद व्यवहार होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी फिर्यादीला या संदर्भात तपासणी करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार तपासणी केली असता सदरची बाब स्पष्ट झाली आहे.

अमित देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशिअर कम क्लार्क साधना कळंत्रे यांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली.ती खरी असल्याचे भासवत बँकेत अपहार व अफरातफर केली.बारामती शाखेच्या सस्पेन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना २ कोटी ३० लाख रुपये परस्पर उचल करून ती त्यांनीच उघडलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली.बँक ऑफ बडोदा येथे भरणा करण्यासाठी ३१ लाख रुपये काढत त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली आहे. धन्वंतरी पतसंस्थेच्या नावे ५ बनावट ओडीटीडीआर खाते उघडून त्यातील ३ कोटी २३ लाख ७१ हजार ८९७ रुपये स्वःतच्या फायद्यासाठी वापरले आहेत.

बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खाते प्रकारा मध्ये ८३ खातेदारांचे बँकेत ठेवलेले सोन्याचे खरे दागिने काढून तेथे बनावट दागिने ठेवले असून खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देत त्यावरही कर्ज काढलेले आहे.

ग्राहकांच्या नावे बनावट खाती काढली आहेत.त्यावर बनावट सह्या करून त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट सोने ठेवले आहे.त्याद्वारे ३७ लाख ५६ हजार ८०३ रुपये स्वतःसाठी वापरले आहेत.

बँकेतील सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये ३ कोटी १८ लाख ३७ हजार ४६४ रुपयांचा अपहार केला आहे.असा एकूण ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार करत बँकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी पोलीस निरीक्षक विलास नाळे हे सदर घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading