संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री. पांडूरंगाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान- व्यवस्थापक मनोज श्रोत्री
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.15- श्री. संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळयासाठी मंदिर समितीमार्फत श्री. विठ्ठलाच्या पादुका 2014 पासून ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांचे पायी दिंडी सोबत आळंदी येथे नेण्यात येतात. सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द 15 ते मार्गशिर्ष शुध्द 9 या कालावधीत आळंदी येथे जाऊन परत येत असतो. प्रतिवर्षीप्रमाणे या सोहळ्याचे दि.15 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्थान झाले असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

कार्तिक शुध्द 15 रोजी गोपाळपूर येथे गोपाळ काला होऊन सर्व संतांच्या दिंड्या मार्गस्थ झाल्या व कार्तिकी यात्रेची सांगता झाली. परंपरेनुसार श्रींच्या पालखींची नगर प्रदक्षिणा झाली. यावेळी श्रींच्या पालखीचे अबाल, वृध्द, अनाथ, दुर्बल, भाविकांनी दर्शन घेतले.
सदरचा पालखी सोहळा कार्तिक शुध्द 15 म्हणजे दि.15 नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून प्रस्थान करून कार्तिक वद्य 9 दि.24 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे पोहचणार असून त्यानंतर दुस-या दिवशी इंद्रायणी स्नान, पालखी प्रदक्षिणा, द्वादशी खिरापत व दि.28 नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानोबाराय संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे.
पालखी सोहळा प्रस्थानावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, सोहळा मार्गदर्शक तथा सदस्य सल्लागार परिषद ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.

सदरचा पालखी मार्गशिर्ष शु. 8/9 दि.09 डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरला परत येत आहे. या पालखी सोहळ्याच्या पायी मार्गावर आवश्यक त्या सोई सुविधा उपलब्ध करून देणेबाबत कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना पत्रव्यवहार करून सोई सुविधा उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. पुजारी तथा सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी यांची पालखी सोहळा संपर्क प्रमुखपदी (मो.7023232364) नियुक्ती करून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच या पालखी सोहळ्यासोबत पौराहित्य करणारे कर्मचारी पूर्णवेळ उपस्थित राहणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
