चंद्रभागा नदीपात्रात जलवाहतूकीस प्रवाशी संख्या मर्यादेसह सुरक्षेच्या साधनांचा वापर अनिवार्य
उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने आदेश केले जारी
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.07:- कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदीपात्रात जलवाहतूकी दरम्यान प्रवाशी संख्या निश्चित ठेवून वाहतूक करण्यास व सुरक्षेच्या साधनांचा प्रवाशी व चालकांनी अनिवार्यपणे वापर करण्यास तसेच सूर्योदयापूर्वी व सूर्योदयानंतर होडीतून प्रवास करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले.
कार्तिकी यात्रा सोहळा कालावधीत सुमारे 5 ते 6 लाख भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व चंद्रभागा स्नानासाठी पंढरपूरला येतात. कार्तिकी एकादशीला येणारे भाविक चंद्रभागा नदीस्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला जातात.भाविक नदीपात्रातून जलवाहतूक करून विष्णुपद,इस्कॉन मंदिर येथे दर्शनसाठी जातात.होडीचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी होडीत भरून वाहतूक करीत असल्याचे वारंवार निदर्शनास आले असून, नदीपात्रात अनुचित प्रकार घडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तसेच प्रवाशांकडून अवाजवी पैसे घेतलेच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याने प्रशासनाकडून यात्रा कालावधीतील होडयांचे नियमन व वाहतूक योग्य रितीने होणेकामी आदेश जारी करण्यात आले आहेत.

होडीतून वाहतूक करतेवेळी सुरक्षा जॅकेट घालणेत यावे, क्षमतेपेक्षा जास्त भाविक होडीत बसवू नयेत, सूर्योदयापूर्वी व सूर्योदयानंतर होडीतून प्रवास करू नये. नियमित करून दिलेल्या वेळेतच जलवाहतूक करावी. सदरचा आदेश दि.15 नोव्हेंबर 2024 पर्यंत रात्री 11.59 पर्यंत लागू राहील. सदरच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित कायदेशीर कारवाईस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
