भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी- शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

भोसरी येथील बांधकाम कामगारांचा मृत्यू दुर्दैवी;शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली घटनास्थळाला भेट

कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक

पुणे दि.२५ ऑक्टोबर २०२४ : भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. येथील ठेकेदाराने येथील टाकीची बांधणी व्यवस्थित केली असती तर हा प्रसंग ओढवला नसता. तसेच येथील कामगार हे कुठून आलेले आहेत याची माहिती पूर्णपणे नाही. कामगार विभाग आणि महापालिका सातत्याने कामगारांची नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. यातून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागू शकतो. जे श्रमिक कामगार आहेत त्यांची अधिकृतपणे नोंदणी होणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर त्यांना जे लाभ मिळतात त्याबद्दल कामगार अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. बऱ्याचदा हे लाभ द्यावे लागू नयेत म्हणून कंत्राटदार त्यांची अधिकृत नोंदणी करण्यास विलंब करत असतात त्यामुळे कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचे मत शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

याखेरीज पिंपरी चिंचवड भागात सर्वच ठिकाणी कामगारांची नोंदणी होण्यासाठी तपासणी मोहिमेचे आयोजन करावे,ज्या ज्या ठिकाणी लेबर कॅम्प आहेत तेथे मोबाईल व्हॅनने काय सोयी सुविधांची तरतुद केली आहे याची देखरेख करणारी नोंदणी व तपासणी सुरू करावी.या घटनेतील मृत्युमुखी पडलेले कामगार हे बाहेर राज्यातील असल्याने त्या त्या राज्यातील प्रशासनाला यासंदर्भात माहिती देऊन त्यांच्या परिवाराला कळवावे, या घटनेत ज्यांना अपंगत्व आलेले आहे तसेच ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या सर्वांचा खर्च संबंधीत कंपनीने करावा आणि या घटनेचा सविस्तरपणे अहवाल सादर करावा असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

तसेच यापूर्वी देखील तळवडे येथे दुर्दैवी घटना घडली होती त्यासंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी अंतर्गत प्रश्न घेऊन निर्देश देखील दिले होते.यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने संपूर्ण सर्वेक्षण करून कामगारांना कशा प्रकारे सुरक्षा देता येईल याबद्दल अहवाल मागविला होता.पिंपरी चिंचवड, भोसरी भागातील रेड झोन चा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे येथील जमिनीवर असणाऱ्या मजूर कॅम्प हे चिंतेचे विषय बनले आहेत असेही डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी सारिकाताई पवार,मनीषाताई परांडे,संभाजी शिरसाठ, दादासाहेब बांगर तसेच कामगार उपायुक्त अभय गीते, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण,उपअग्निशामक अधिकारी दिलीप गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहीवाल, पिंपरी चिंचवड मनपा उपअभियंता मनोज बोरसे, विभाग अधिकारी फडतरे, लेबर अधिकारी श्रीकांत चौबे उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading