जिल्ह्यात सर्वात जास्त दर आपण दिल्याने ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली याचा परिणाम म्हणुन शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळतोय -चेअरमन अभिजीत पाटील
श्री विठ्ठल कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न

वेणुनगर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०८/०९/२०२४- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.,वेणूनगर या कारखान्याचा २०२४-२०२५ हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प.श्री भगवंत महाराज चव्हाण, माळखांबीकर यांचे हस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर प्रसंगी ह.भ.प.श्री भगवंत महाराज चव्हाण बोलताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असून तो चालला तर या तालुक्याचे अर्थकारण बदलते.या कारखान्याला लाभलेले नेतृत्व हे विठ्ठल कारखान्यास गतवैभव मिळवुन देणारे आहे यात कोणतीही शंका नाही. मागील दोन वर्षापासून बंद असलेला कारखाना त्यांच्या नेतृत्वात उत्तम प्रकारे चालविण्यात येत आहे व यापुढेही कारखान्याच्या सभासदांना ते न्याय देतील. या कार्यक्रमास आपण मला बोलावले त्याबद्दल मी सर्व संचालक, सभासद व कामगार यांचे आभार मानतो.

यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील म्हणाले की, आपला कारखाना बंद होता त्यावेळी शेजारील कारखानदार हे आपल्या ऊसावर डोळा ठेवून होते. परंतु आपला श्री विठ्ठल कारखाना चालु झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होवून त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुध्दा आपण जिल्ह्यात सर्वात जास्त दर देवून आपण ऊस दराची स्पर्धा निर्माण झाली याचा परिणाम म्हणुन शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळतो आहे.
एन.सी.डी.सी. कडुन कारखान्यास कर्ज मंजुर झाल्याने थकीत असलेली ऊस बिले, तोडणी वाहतुकदार यांची बिले पुर्णतः अदा केली आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट अदा करणेत येणार आहे.

कारखान्याची ऑफ सिझनमधील दुरुस्ती व देखभालीचे कामे प्रगतीपथावर असून गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खातेप्रमुखांनी कामकाज करुन घ्यावे, अशा सुचना देऊन कारखाना वेळेवर चालू करणेसाठी प्रयत्नशील राहावे. तसेच येत्या गळीत हंगामात १० हजार प्र.मे. टनाने कारखाना चालवुन जास्तीत जास्त गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कारखान्याकडे इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प नाही त्यामुळे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे १ लाख लिटर प्रति दिन क्षमतेचा क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प व डिस्टीलरीची उत्पादन क्षमता वाढवून १ लाख लिटर करणेचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लक्षणीय असून एम. आय.डी.सी. झाल्यास येथील युवकांना रोजगार मिळतील. त्याकरीता भविष्यात आपण संधी दिल्यास पंढरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच श्री विठ्ठल सुतगिरणी चालु करणेसाठी पाठपुरावा ही चालु आहे. तरी आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. त्या विश्वास पात्र राहून मी सदैव आपल्या सेवेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमप्रसंगी दत्ता नागणे, राम वाघ, वाय.जी.भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के सर व सुत्र संचालन नितीन पवार ऊस पुरवठा अधिकारी यांनी केले. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे,संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती खटके, सौ. सविता रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, निमंत्रीत संचालक धनाजी खरात, सचिन पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे,स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव बी.पी.रोंगे सर,श्री विठ्ठलचे कार्यकारी संचालक आर.बी.पाटील,जनरल मॅनेजर डी.आर. गायकवाड,कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, दिलीप पुरवत, मल्हारी धुळा खरात यांच्यासह कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
