नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद
वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार ,समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबई, दि.२३: नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी २४ जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचविण्यात येणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री.शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू. त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
