मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल

आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

मुंबई ,दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क असतो त्यावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्याचा ट्रॅक ठेवणे,त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थिनींना थोडा जरा संशय आल्यास त्यांना तातडीने प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असे मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्था चालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading