गुरुदेव समंतभद्र महाराज: संस्कारप्रधानी शिक्षण महर्षी -प्रा.एन.डी.बिरनाळे,सांगली
भारत ही साधू संतांची भूमी आहे. विविध धर्मातील साधू संतानी आत्मकल्याणाबरोबर जनकल्याणकारी कार्य केले आहे. जैन धर्मातही असे साधू होऊन गेले आहेत आणि आजही आहेत.
२० व्या शतकातील दोन साधूंना आपण विसरु शकत नाही. ज्यांनी निर्दोष मुनी चर्या व शिक्षण कार्यातून दिगंबर साधू व गुरुकुल शैक्षणिक परंपरा पुनर्जीवित केली त्यामध्ये…
१)३५० वर्षाची खंडीत जैन दिगंबर मुनी परंपरा निर्दोष आचरणाने पुनर्जीवित केली ते प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व
२)प्राचीन गुरुकुल शिक्षण परंपरा पुनर्जीवित केलेले गुरुदेव समंतभद्र महाराज
गुरुदेव समंतभद्र महाराजांचा १८९१ ते १९८८ हा कालावधी गुरुदेव समंतभद्र युग होय
गुरुदेवांचे आजोबा खेमचंद गुजरात मधून करमाळ्याला स्थलांतरीत झाले.देवचंद लहानपणापासून धार्मिक.. आई वडिलांच्या संस्कारांने मंडीत..
बी. ए. पदवी विल्सन काॅलेज मुंबई येथून घेतली. त्यावेळी हिराचंद गुमानजी जैन बोर्डिंगमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा संपर्क आला. श्रवणबेळगोळ येथे भ.गोमटेश महामस्तकाभिषेक- १९१० प्रसंगी भाऊराव (कर्मवीर) आणि देवचंद (गुरुदेव समंतभद्र) स्वयंसेवक होते. याच महामस्तकाभिषेक सोहळ्यात भाऊराव पाटील शेवटच्या दिवशी भ.गोमटेश महामूर्ती समोर हात जोडून म्हणतात ‘हे भ.गोमटेशा,तुझी तपश्चर्या मोठी.. तुझा आत्मकल्याणाची संयमी कर्तबगारी मोठी.. मीही थोडंफार आयुष्यात मोठं कार्य करीन.
त्यावेळी त्यांच्याबरोबर स्वयंसेवक म्हणून सहभागी देवचंदांनीही जरुर मोठ्या कार्याचा संकल्प केला असणार म्हणून तर रयत आणि गुरुकुल परिवार उभा राहिला आहे.
रयत शिक्षण संस्था स्थापन करुन अण्णांनी प्रतिज्ञा पुरी केली. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत भाऊराव पाटील यांच्या घराण्याच्या जैन संस्काराचा वाटा मोठा आहे. त्याप्रमाणे गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये जैन संस्कारच कारणीभूत आहे.हिराचंद गुमानजी जैन बोर्डिंग मधील दोघांचे वास्तव्य आणि भ.गोमटेश महामस्तकाभिषेक सोहळ्यात एकत्र येऊन केलेली स्वंयसेवा ही दोघांच्याही शैक्षणिक कार्याची आधारशिलाच म्हणावी लागेल.
१९३३ मध्ये प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचा राजस्थाना तील ब्यावर येथे चातुर्मास सुरु असताना गुरुदेवांना शांतीसागर महाराजांनी क्षुल्लक दीक्षा व गुरुकुल काढण्यासाठी अनुमती दिली. हे प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे मोठे कार्य म्हणावे लागेल.
प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांनी शैक्षणिक कार्यासाठी दक्षिण भारत जैन सभा व दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे आणि गुरुदेव समंतभद्र महाराज यांना आशीर्वाद दिला होता. दर्शनासाठी आल्यानंतर एकदा कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपण महाराजांचेच कार्य करत आहात माझा आशीर्वाद आहे,असे म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला बळ दिले होते.
गुरुदेवांनी देशसेवा, धर्मसेवा व समाजसेवा करण्याचा संकल्प ऐन तारूण्यात केला व बलदंड शरीरयष्टी कमवून त्याचा उपयोग आत्मकल्याणाबरोबर जनकल्याणकारी कार्यासाठी केला.
विद्यार्थी दशेत जयपूर येथे वसतिगृहात असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. आणि सोलापुरात लो. टिळकांच्या हस्ते ‘बोलोत्तेजक समाज’ संस्थेचे उद्घाटन करुन संस्था स्थापन केली होती.
प. पू. श्री. १०८ वर्धमानसागर यांचेकडून दिगंबर मुनी दीक्षा घेऊन प्रथमाचार्य शांतीसागर महाराज व प. पू. वर्धमानसागर महाराजांनी आखून दिलेल्या धर्म आणि शिक्षण मार्गावरुन यशस्वी वाटचाल करतांना लाखो भक्तांना, कल्याणाचा आशीर्वाद देताना साक्षात आईच्या वात्सल्याची अनुभूती येत असे.
गुरुदेव समंतभद्र यांनी कारंजा, वेरुळ, बाहुबली, स्तवनिधी, बेल्लद बागेवाडी,अकोळ, सिदनाळ तारदाळ, सोलापूर, गजपंथ, तेरदाळ, खुरई मध्य प्रदेश, कारकल कर्नाटक येथे गुरुकुल व ब्रम्हचर्याश्रम काढून लाखो मुला मुलींना शिक्षणाची दारे खुली केली व त्यांना आदर्श स्वावलंबी नागरिक बनवले.
आत्मकल्याणाबरोबर शिक्षण व संस्कारांचे जनकल्याणकारी कार्य केले.हे करत असताना त्यांना भिसीकर गुरुजी , बेडगे गुरुजी , गजाबेन, करके गुरुजी, चवरे गुरुजी ,शांतीकुमार गुरुजी, मगदूम अण्णा असे निःस्वार्थी मानसेवी चारित्र्यवान शिष्यही लाभले म्हणून कार्य तडीस गेले. गुरुदेवांच्या संस्कार शाळेत वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे घडले म्हणून वीर सेवा दल वाढले. आज गुरुदेव समंतभद्र महाराजांचा स्मृतीदिन.. गुरुदेवांची समाधी होऊन ३६ वर्षे झाली. शिष्य वीराचार्य १६ ऑगस्टला आणि त्यांचे गुरु गुरुदेव १८ ऑगस्टला गेले.. दोघांच्याही अंतीम यात्रेत सहभागी होताना खूप गलबलून आले कारण शिष्य गेल्याचे गुरुना आणि गुरु गेल्याचे शिष्याला कळालेच नाही. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांचे संरक्षण व संवर्धन ही त्यांच्या स्मृतीस खरी आदरांजली ठरेल..!
प्रा.एन.डी.बिरनाळे , सांगली – ज्ञानप्रवाह न्यूज
दि.१८.८.२०२४
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
