संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद व पालखीची नगर प्रदक्षिणा

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०४/०८/२०२४- श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा आषाढ वद्य त्रयोदशी शुक्रवार दि.2 ऑगस्ट रोजी किर्तन, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद वाटप व अमावस्ये दिवशी पालखीची नगर प्रदक्षिणा काढून साजरा करण्यात आला.

संत नामदेव महाराजांसह त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्या व संत जनाबाई यांनी महाद्वार येथे संजीवन समाधी घेतली होती. या घटनेला 674 वर्ष पूर्ण झाली आहेत. येथील संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील संत नामदेव मंदिरात संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमाच्या अंतर्गत बुधवार दि. 31 जुलै रोजी एकादशी दिंडीची नगर प्रदक्षिणा झाली. गुरुवार दि. 1 ऑगस्ट रोजी क्षीरापतीचा कार्यक्रम झाला. मुख्य दिवस शुक्रवार दि. 2 ऑगस्ट रोजी पहाटे श्री केशवराज (पांडुरंग) व संत नामदेव महाराजांना समाजाचे जेष्ठ विश्‍वस्त संजय चांडोले, युवक संघटनेचे नितेश धट यांच्या हस्ते अभिषेक घालूत आरती करण्यात आली. दुपारी 1 वाजता संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. केशव महाराज नामदास यांचे किर्तन घाले. यानंतर गुलाल पुष्पवृष्टी होऊन महाआरती करण्यात आली. त्यानंतर केशवराज संस्थेचे अध्यक्ष व दक्षिण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके,छायाचित्रकार किशोर काकडे यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला.

‘नामदेव-जनाबाई’ असा जयघोष करत श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्रीसंत नामदेव पायरी येथे समाजाचे खजिनदार शशिकांत जवंजाळ व युवक संघटनेचे अध्यक्ष शैलेश धट यांच्या हस्ते महानैवेद्य दाखविण्यात आला. समस्त नामदेव शिंपी समाज, पंढरपूर यांच्यावतीने सर्व वारकरी भाविक व समाज बांधवांना महाप्रसाद देण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे, उपाध्यक्ष व पंढरपूर मर्चंट बँकेचे संचालक संजय जवंजाळ, मुख्य विश्‍वस्त व कवठेकर प्रशाला शिक्षक सेवक सोसायटीचे चेअरमन राजेश धोकटे सर, सचिव विलास पोरे, अनंता पतंगे-म्हेत्रे, दत्तप्रसाद निपाणकर, माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर भावलेकर गुरुजी, सेवक राजाभाऊ जवंजाळ, जयवंत कांबळे, अनिल धट, रमेश डोंगरे,मिलिंद निकते,भारत चांडोले, सुरेश सरवदे, महिला मंडळाच्या मिना चांडोले, आशा धोकटे, गीता पोरे, उज्वला म्हैंदरकर, तेजश्री कटारे, धनश्री देवळे, स्वाती जवंजाळ, अमृता बंगाळे, युवक संघटनेचे प्रथमेश परांडकर, दत्ता चांडोले, सचिन केकडे, निलेश धोकटे, पांडुरंग गाणबोटे, कृष्णा जवंजाळ, अक्षय जवंजाळ, महेश गाणबोटे, रत्नाकर पिसे, संतोष पतंगे, प्रथमेश मुळे, महेश निपाणकर, शशिकांत बुरांडे, आनंद बंगाळे, अक्षय बंगाळे यांच्यासह समाज बांधव व युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला मुंबई येथून संपूर्ण खांडके परिवार उपस्थित होता.

शनिवार दि. 3 ऑगस्ट रोजी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. नामदास महाराजांचे किर्तन झाले. रविवार दि. 4 रोजी दुपारी ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सर्वांना काल्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणेला निघाला, ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाईचा गजर करत टाळ- मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पुंडलिक मंदिरामार्गे संत नामदेव पायरी येथे आला. याठिकाणी मानाचे अभंग व आरती झाल्यानंतर पुन्हा पालखी सोहळा संत नामदेव मंदिरात आला. याठिकाणी नामदास परिवारातील सुवासिनी महिलांनी पालखीचे औक्षण केले. त्यानंतर अभंग व आरती झाल्यानंतर मानकर्‍यांना श्रीफळ प्रसाद देवून महोत्सवाची सांगता करण्यात आली. वरील सर्व धार्मिक कार्यक्रम सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यासाठी सर्वश्री ह.भ.प. एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, विठ्ठल महाराज, हरि महाराज, मुरारी महाराज, केदार महाराज नामदास व फडकरी यांनी परिश्रम घेतले.

समाधी सोहळ्याची शासनाने घेतली दखल

यावर्षी संत नामदेव महाराजांचा 674 वा संजीवन समाधी सोहळा सर्वत्र साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेवून संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा राज्य शासनाच्यावतीने साजरा करणार असल्याचे जाहिर केले. त्याप्रमाणे मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी संत नामदेवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. पुढील वर्षी 675 वा समाधी सोहळा साजरा होणार असून तो शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा.तसेच पंढरपुरात मंजूर करण्यात आलेल्या संत नामदेव महाराजांच्या स्मारकाचे काम लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी केली आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading