महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिल्लोड येथे मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजने चा शुभारंभ

महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर), दि. २ – महिलांच्या सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे सरकारचे ध्येय्य आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले.

सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे आज आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ आज महिलांना प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

या भव्य सोहळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आ.प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीला ऑलम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडलवर नाव कोरणाऱ्या स्वप्नील कुसाळे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचं अभिनंदन केलं. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचे आणि जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही अभिनंदन केलं.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

योजनेचे देशपातळीवर कौतुक

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी इतके दिवस म्हणायचो की मला एक बहीण आहे; पण मुख्यमंत्री झाल्यापासून तुमच्या रूपाने राज्यातल्या लाखो बहिणी मला मिळाल्या, हे माझं भाग्य आहे. मी जिथे जातोय तिथे बहिणी राखी बांधायला येतात. इतकं नशीबवान भाऊपण मिळायला भाग्य लागतं. तुमच्या या भावाची जबाबदारीपण आता वाढली आहे. या योजनेमुळे देशपातळीवरही राज्याचे कौतुक झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय हा देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही. आपण महिलांना दुर्गा म्हणतो, लक्ष्मी म्हणतो, सरस्वती म्हणतो पण फक्त फोटोत पूजा करून भागणार नाही.प्रत्यक्षात महिलांचे हात बळकट करणं महत्वाचं आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे केले पाहिजे म्हणून शासनाने या योजना सुरू केल्या आहेत.

प्रत्येक कुटुंब सुखी करणे हे ध्येय

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, एक स्त्री म्हणजे एक आख्खं कुटुंब. राज्यातील प्रत्येक कुटुंब सुखी – समाधानी करणं हे सरकारचं पहिलं आणि अंतिम ध्येय आहे. महिला सक्षमीकरण हे सरकारच्या प्रत्येक निर्णयात ते दिसलं पाहिजे. शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये एका बहिणीला मिळतील.बहिणींना आता फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबिजेलाच ओवाळणी मिळणार नाही तर दर महिन्याला दीड हजार रुपयांचा माहेरचा आहेर देणारी ही योजना कायमस्वरूपी आहे,अशा शब्दात त्यांनी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.

वर्षभरात दोन कोटींहून अधिक भगिनींना लाभ

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, ,लाडकी लेक योजन, मुलींचे उच्च शिक्षणही मोफत करणे, एस.टी. प्रवासात 50 टक्के सवलत, महिला सशक्तीकरण अभियन अशा विविध योजनांमधून एका वर्षांत दोन कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा लाभ झाला असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

फक्त बहिणींसाठी नव्हे तर लाडक्या भावांसाठीसुध्दा मुख्यमंत्री युवा अप्रेंटिंसशीप योजना आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. लाडक्या बहिणींसाठी अर्थसंकल्पात 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्य कल्याणकारी योजनांसाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांची तजवीज केली आहे. जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी अटी कमी केल्यात. राज्यातील महिलांच्या चेहऱ्यावर या योजनेमुळे आनंद निर्माण झालाय हे सत्य आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन लाख अर्ज मंजूर झाले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी बहिणींचे अभिनंदनही केले.

मराठवाडा वॉटरग्रीडची अंमलबजावणी होणार

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मराठवाडा वॉटर ग्रीडची आजवर फक्त चर्चाच व्हायची.पण या योजनेची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे. जिल्ह्यात उद्योगासाठी गुंतवणुक होत असून रोजगारनिर्मिती होणार आहे. हिरकणी कक्ष बांधण्यासाठी ७५ लाख रूपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

लाभाचे प्रातिनिधीक वितरण

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये गिताबाई जंजाळ, वर्षा बाळू पांडव, लक्ष्मीबाई पंडित, करुणा बारवाल , संगीता अंभोरे ,मीराबाई सपकाळ, दिव्या सपकाळ, मनीषा अहिरे ,अखिला याकुब शेख ,शोभा दांडगे , मोनिका शिरसाठ, वत्सला जाधव ,वंदना काकडे, अलकाबाई पगारे, रुकसाना दिलावर तडवी, कविता अहिरे, नंदा पालोदकर,कल्पना चव्हाण आदी महिला लाभार्थ्यांचा समावेश होता.

स्वतः मुख्यमंत्र्यांनी भरला दिव्याचा फॉर्म

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी दिव्या रामदास सपकाळ या बहिणीचा फॉर्म स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरला आणि त्यावर तिची सही घेऊन तो फॉर्म जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मंजूरी प्रक्रियेसाठी सुपूर्द केला.

पारंपारिक वेशभुषेतील बहिणी आणि रक्षाबंधनही

या सोहळ्यास महिला पारंपारिक वेशभुषेत पेहराव करुन सहभागी झाल्या होत्या. अनेक महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना मोबाईल टॉर्च सुरु करण्याचे आवाहन केले त्यास उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सिल्लोड मध्ये रोड शो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळापासून सिल्लोड येथे येईपर्यंत रस्त्यात लागणाऱ्या प्रत्येक गावात स्वागत करण्यात आले. तेथेही महिलांनी त्यांना ओवाळले व राखी बांधली. सिल्लोड शहरात तर मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला. रोड शोद्वारे सिल्लोडवासियांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले .जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सादर केली.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading