राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

राजेवाडी तलाव प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

आमदार सदाभाऊ खोत यांच्या पत्रावरून दिला आदेश, मुख्यमंत्री महोदय,आ.सदाभाऊ खोत व अन्य लोकप्रतिनिधींचे होत आहे अभिनंदन

५ खासदार,१२ आमदारांनीही राजेवाडी प्रश्नी दिले समर्थन

आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .२५ – राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने १४० वर्षापासून आटपाडी तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाचे राज्याचे अप्पर मुख्य सचिवांना याबाबत तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत .

आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार शेतकरी साहित्य इर्जिक परिषदेचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी राजेवाडी तलाव प्रश्नी आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह राज्यातील अनेक आमदार, खासदार महोदयांचे लक्ष वेधले होते .

आमदार सदाभाऊ खोत यांनी दि.२३ एप्रील रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दिलेल्या पत्रात १८७६ साली उभारलेला ३ टीएमसी क्षमतेचा म्हसवड तलाव म्हसवड ता.माण जि.सातारा हा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या ज्या राजेवाडी गावात उभा आहे ते राजेवाडी गाव नावापासून आणि बहुतांश आटपाडी तालुका १४० वर्षापासून पाण्याअभावी वंचित आहे हे मोठे दुर्देव आहे .

म्हसवड मध्यम प्रकल्पाचे नाव शासन दरबारी राजेवाडी तलाव असे केले जावे ,फलटण जि.सातारा येथील या तलावाचे मुख्य व्यवस्थापन सांगली जिल्हा जलसंपदाकडे दिले जावे, पंढरपूर जि.सोलापूर येथील उपविभागीय कार्यालय,आटपाडी जि.सांगली येथे सुरु केले जावे ,महुद ता.सांगोला,जि. सोलापूर येथील शाखा कार्यालया बरोबर राजेवाडी ता.आटपाडी येथेही शाखा कार्यालय व्हावे ,राजेवाडी तलावाला नवा कॅनॉल काढून या कॅनॉलला आटपाडी तालुक्यातील सर्व तलाव जोडले जावेत, उरमोडी अथवा निरेच्या पाण्याने राजेवाडी तलाव बारमाही करावा .

या लक्षवेधी न्याय मागण्यांच्या अनुषंगाने राज्य शासनाने योग्य तो निर्णय सत्वर करावा अशी विनंती केली आहे.या पत्रावरच मुख्यमंत्र्यांकडून आदेश दिले गेले आहेत .

राजेवाडी प्रश्नी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे बारामती , खा. विशाल पाटील सांगली,खा.अमोल कोल्हे शिरूर पुणे,खा.अमर काळे वर्धा, माजी मंत्री, खा . फौजिया खान राज्यसभा सदस्य, परभणी, हे ५ खासदार तसेच माजी मंत्री आमदार सुरेश खाडे मिरज ,आ. सुधीर गाडगीळ सांगली,आ.सुहास बाबर खानापूर , आ.गोपीचंद पडळकर जत,आ. रोहीत आर . आर.पाटील तासगांव – कवठेमहंकाळ, माजी मंत्री आ.विश्वजीत कदम पलुस कडेगांव, आ. इद्रिस नायकवडी मिरज ,आ.उत्तम जानकर माळशिरस,आ.जयंत आसगांवकर कोल्हापूर, आ .बापूसाहेब पठारे वडगांव – शेरी पुणे, आ .अभिजित पाटील माढा या ११ विद्यमान लोकप्रतिनिधीं सह एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे मुख्य संपादक राजीव खांडेकर,श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ.भारत पाटणकर कासेगांव , माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख खानापूर – आटपाडी , जि प माजी अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख आटपाडी , दै . जनप्रवास चे संपादक संजय भोकरे सांगली, इत्यादी मान्यवरांनी राजेवाडी प्रश्नी समर्थन दिले असून मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रेही पाठविली आहेत .

अप्पर मुख्य सचिव यांनी पाहणीसाठी राजेवाडीला यावे वस्तुस्थिती जाणून घ्यावी, काय बदल अपेक्षित आहेत, यावर लोकमत जाणून घ्यावे व लोकप्रतिनिधी, संघटना, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून समस्या समजून घ्यावी आणि वस्तुनिष्ट अहवाल मुख्यमंत्री महोदयांना सादर करावा अशी जनतेची मागणी आहे .


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading