काश्मिर हून महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत महाराष्ट्रात दाखल

महाराष्ट्रातील ५०० पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल

१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली,२३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष विमान

मुख्यमंत्र्यांनी घेतला गिरीश महाजनांकडून आढावा, लष्करी रुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद

मंत्रालयात विशेष कक्ष, महाराष्ट्र सदनातूनही समन्वय

मुंबई, दि.२४ एप्रिल २०२५ : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर विविध प्रयत्नांतून गेल्या 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडियाच्या दोन विशेष विमानांची व्यवस्था पर्यटकांसाठी केली होती, त्यातून 184 पर्यटक मुंबईत दाखल झाले आहेत. आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मिरला जाण्यास सांगितले होते. गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकूणच स्थितीचा आढावा घेतला. उद्यासाठी आणखी विमाने करायची असतील तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असे त्यांनी सांगितले. गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवाद साधला आणि उपचार करणार्‍या तेथील डॉक्टरांचे आभारही मानले.

काश्मिरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून येणाऱ्या विनंतीवर काम केले जात आहे. काही पर्यटकांची कालिका धाम जम्मू येथे राहण्याची व्यवस्था केली गेली. अमरावती येथील सुमारे 14 पर्यटक येथे थांबले होते. काही पर्यटक मिळेल त्या व्यवस्थेने जम्मूवरुन दिल्लीकडे रवाना झाले असून, त्यांची दिल्ली येथे व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या काश्मिरातून येणाऱ्या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक असणार आहेत. दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडली तर परवाही विशेष विमान करण्याची तयारी राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading