तुळजापूर मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम होणार – डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक

तुळजापूर मंदिर व्यवस्थापन अधिक सक्षम होणार – डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.३ एप्रिल २०२५ : तुळजापूर देवी मंदिर विकास आराखड्यास वेग देण्यासाठी आणि भाविक व पुजाऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे पंढरपूर विकास आराखड्यासाठी धोरण आखले, त्याच धर्तीवर तुळजापूर विकास आराखड्यावर काम करण्यात येईल.

प्रसाद सेवा,पार्किंग आणि हरित क्षेत्रासाठी ठोस उपाय – डॉ.नीलम गोऱ्हे

बैठकीत प्रसाद सेवा त्वरित सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच, भाविक आणि पुजाऱ्यांसाठी अंतिम निर्णय घेताना त्यांच्या गरजा प्राधान्याने विचारात घेतल्या जातील. पार्किंग सुविधांसाठी योग्य नियोजन करून त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

त्याचबरोबर तुळजापूर मंदिर प्रशासनाशी संबंधित काही प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.ही प्रकरणे लवकर निकाली लागावी यासाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठपुरावा केला जाईल,असेही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

भाविकांच्या निवास आणि सोयी-सुविधांसाठी विशेष योजना

भाविक मोठ्या संख्येने येतात आणि पारंपरिक पद्धतीने पुजाऱ्यांच्या घरी निवास करतात. ही व्यवस्था अधिक सुव्यवस्थित करण्यासाठी एमटीडीसीच्या सहकार्याने विशेष योजना आखण्याची सूचना करण्यात आली.

आपत्ती व्यवस्थापन आणि मंदिरांचे आधुनिकीकरण

राजन कोचर समितीच्या अहवालानुसार,महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये बदलत्या गरजांनुसार व्यवस्थापन पुनरावलोकन करावे, अशी सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. यामध्ये मंदिर परिसरातील सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, साड्या- दागिन्यांचे व्यवस्थापन आणि कुळाचारासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच जोगते,भोपे आणि कडकलक्ष्मीं साठी स्वतंत्र व्यवस्थेचा प्रस्तावही मांडण्यात आला.

शासनाच्या सहकार्याने विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी

तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे विशेष पाठपुरावा करण्यात येणार आहे.शासनाच्या सहकार्याने मंदिर व्यवस्थापन अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading