विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन
तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील- डॉ. नीलम गोऱ्हे
तुळजापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ एप्रिल २०२५ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या भक्तीचा विशेष उल्लेख केला.

याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आज तिथीनुसार शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे, तसेच चैत्र नवरात्र देखील सुरू आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी येथे आले आहे. अनेकदा देवीच्या चरणी प्रार्थना केली होती, आज कुटुंबातील आनंदाचे क्षण लाभल्याबद्दल देवीचे आभार मानले.
राजकीय संदर्भ आणि महाराष्ट्रातील जनादेश
त्या पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, त्यानंतर मी येथे येऊन गेले होते. आता महाराष्ट्रातील निवडणुकीत महायुतीला २३५ आमदार मिळाले असून, त्यापैकी ६० आमदार हे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांचे आहेत. जनतेने घटनेनुसार हा जनादेश दिला असून, हे सरकार संविधानिक मार्गाने स्थापन झाले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, काल ऐतिहासिक विधेयक मंजूर झाल्यानंतर लाडक्या बहिणींचा सन्मान कार्यक्रमासाठी मी धाराशिवमध्ये आले आहे. लाडक्या बहिणींप्रमाणे तुळजाभवानी माता आपले सर्वात लाडके दैवत असल्यामुळे येथे दर्शनासाठी आले आणि पूजा केली.

तुळजापूरच्या विकास आराखड्यावर चर्चा
तुळजापूरमधील प्रमुख समस्यांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले,शहराच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये जनतेला सहभागी करून तो कसा राबवायचा, यासंदर्भात माझी विधान भवनात राणा जगजीतसिंह आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. तसेच, गुरुजी आणि गुरव पंडित यांच्या मानधनासंदर्भातील मागणी प्रलंबित आहे. हा प्रश्न लवकर सुटावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत, तुळजापूरच्या विकासासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
