चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी : बापुसाहेब साठे

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी: बापुसाहेब साठे

ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

नागपुरातून केंद्रात सर्वप्रथम डॉ. केसकर हे पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते. हा साधारणतः १९६० च्या आसपासचा कालखंड असावा. नंतर तब्बल २० वर्ष नागपुरातून कोणीही केंद्रात मंत्री म्हणून विराजमान झाले नव्हते. १९८० च्या जानेवारी महिन्यात जनता पक्षाची राजवट संपून पुन्हा एकदा इंदिरा गांधी पंतप्रधानपदी विराजमान झाल्या, आणि त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात नागपूरकर असलेले वसंत पुरुषोत्तम उपाध्य बापूसाहेब साठे माहिती आणि प्रसारण खात्याचे पूर्णवेळ कॅबिनेट मंत्री झाले. केंद्रात मंत्री म्हणून साठेंना तब्बल ९ वर्षाचा कालखंड मिळाला. त्यानंतरही एक राजकीय विचारवंत म्हणून त्यांनी दिल्लीत राहून आपली कारकीर्द गाजवली. नागपूरचे नाव देशाच्या क्षितिजावर उज्वल करणारे कै. वसंतराव उपाख्य बापुसाहेब साठे हे एक नेते म्हणता येतील.

आज ५ मार्च २०२५ आज कैलासवासी बापूसाहेब साठे यांची शंभरावी जयंती आहे. १९७२ पासून तर जवळजवळ २००८-०९ पर्यंत त्यांनी या देशात आपले स्थान निर्माण केले होते.वसंत साठे हे फक्त एक राजकारणी नव्हते,तर ते कुशल प्रशासक देखील होते. त्याचबरोबर ते जसे एक निष्णात कायदे पंडित होते तसेच ते लढवय्ये कामगार नेते सुद्धा होते. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले ते स्वातंत्र्यसैनिकही होते तसेच काँग्रेसचे एक निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा होते. कला, साहित्य संस्कृती, क्रीडा याचा फक्त अभ्यासच नाही तर त्यात रस ठेवणारे ते एक रसिक व्यक्तिमत्वही होते. तसेच जगन्मित्र देखील होते. इतकेच काय पण हे कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व म्हणूनही ते ओळखले जात होते. त्यांच्याकडे छोट्यातला छोटा माणूस जरी गेला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटायचे,

१९७२ मध्ये खासदार झालेल्या वसंत साठेंनी संसदेत आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची फार थोड्या काळात छाप पाडली होती. त्याचबरोबर राजकीय विचारवंत म्हणून त्यांनी विविध नवे मुद्देही उपस्थित केले होते. एक निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जी सेवा दिली त्याची दखल घेत त्यांची मित्रमंडळी आणि चाहते या वर्षात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ काही कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती आहे.आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या एकूणच फक्त राजकीय क्षेत्रालाच नव्हे, तर देशालाही खूप काही देणाऱ्या या नेत्याची स्मृती चिरंतन ठेवून नव्या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न म्हणून याचे स्वागतच व्हायला हवे.

५ मार्च १९२५ रोजी जन्मलेले वसंत पुरुषोत्तम उपाध्य बापूसाहेब साठे हे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील न्यायीक सेवेत होते. बापूंचे शिक्षण भोसला मिलिटरी स्कूल,नाशिक येथे झाले.शालेय शिक्षण आटोपल्यावर नागपुरात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते आले. त्याचवेळी मॉरिस कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सुद्धा भाग घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा फडकवण्यासाठी ते इमारतीवर ही चढले होते.त्यावेळी पोलिसांच्या लाठ्याही त्यांनी खाल्ल्या.काही वेळा ते हा किस्सा आम्हा पत्रकारांना सांगायचे.

बापूंचा माझा संबंध मी शाळेत शिकत असताना म्हणजेच १९६७-६८ च्या दरम्यान आला. त्यांचा मुलगा सुभाष माझ्याबरोबर शिकत होता.त्यावेळी हडस हायस्कूलच्या स्विमिंग पूलवर आम्ही पोहणे शिकायला जायचो.सुभाषही यायचा आणि आम्हा मुलांना पोहणे शिकवायला तिथे बापूही यायचे.ते पट्टीचे पोहणारे होते.मला आठवते केंद्रीय मंत्री असताना अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्विमिंग पूल चे उद्घाटन करण्यासाठी या असे त्यांना निमंत्रण अमरावतीच्या ह.व्या.प्र.मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यावेळी बापूंनी हसत हसत उत्तर दिले की मी उद्घाटन करीन पण स्वतः पोहून.यावरूनच त्यांचा क्रीडाविषयक सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो.

नागपुरात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्यांनी एल एल बी चा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते वकिली सुद्धा करू लागले. त्याच वेळी ते कामगार चळवळीतही ओढले गेले. त्यामुळे कामगारांचे वकील म्हणूनच त्यांनी ख्याती मिळवली.नागपुरात उच्च न्यायालयात ते जशी प्रभावीपणे कामगारांची बाजू मांडायचे. तसेच कामगारांसाठी संघर्ष करायला एंप्रेस मीलच्या गेटवर देखील उभे राहायचे. त्यावेळी प्रभावी कामगार नेता म्हणून नागपूर विदर्भ आणि जुन्या मध्य प्रांतात त्यांचा दरारा होता.ते फक्त कामगारांचे नेतेच होते असे नाही, तर त्यांच्या मदतीला बापूसाहेब कायम उभे राहायचे.१९६३-६४ च्या दरम्यान कामगारांना आर्थिक मदत हवी होती आणि त्यांना देण्यासाठी बापूंजवळ पैसा नव्हता.

त्यांनी आपली स्वतःची कार विकलीआणि कामगारांना पैसा दिला. नंतर बरीच वर्ष ते स्कूटरवरच फिरत होते.

त्या काळात फक्त कामगार चळवळीतच नाही तर सामाजिक चळवळींमध्येही बापू सक्रिय होते.मला आठवते आम्ही शाळेत असताना गणेशोत्सवातील परिसंवादांमध्ये वक्ता म्हणून बापू ठिकठिकाणी बोलायला जायचे. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिकले असल्यामुळे सैनिकी शिक्षणाबद्दलही त्यांना प्रेम होते. १९६२ आणि १९६५ या काळात चीन आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या वेळी नागपुरातील तरुणांना एकत्र करून त्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याचाही उपक्रम बापूंनी राबवला होता.

१९५७ ते १९६० या कालखंडात विदर्भ वेगळा करायचा की नव्याने स्थापन होणाऱ्या महाराष्ट्रात समाविष्ट करायचा यावर वाद सुरू होता.त्यावेळी कट्टर विदर्भवादी म्हणून बापूसाहेब पुढे आले. ते वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत वेगळ्या विदर्भाची बाजू मांडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी पंडित नेहरू आग्रही होते. तेव्हा बापूंच्या पाठपुराव्यामुळे घटनेत दुरुस्ती करून वैधानिक विकास मंडळे गठित करण्याची तरतूद करण्यात आली. मला आठवते, एकदा वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात बापूंची मुलाखत घ्यायला मी आणि नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर बापूंच्या नागपूरच्या घरी बसलो होतो. तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला होता.

१९८० साली बापूंनी प्रथमच केंद्रात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.त्यावेळी त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आले. त्या काळात देशात मोजक्या सात किंवा आठ ठिकाणी दूरदर्शन केंद्र होती. मात्र बापूंनी या संदर्भात अभ्यास करून धडाकेबाज कार्यक्रम आखला. संपूर्ण देशात राष्ट्रीय प्रसारण व्यवस्था उभारून अगदी गावागावात दूरदर्शन कसा पोहोचेल याची योजना आखली आणि ती कार्यान्वित देखील केली.त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून कार्यरत होतो. तेव्हा बापूंचा विदर्भात दौरा असला की मी त्यांच्यासोबत असायचो. त्यांनी आखलेल्या या योजनांबाबत त्यांचे व्यक्तिगत सचिव प्रभाकर पाठक यांच्याशी त्यांची कारमध्येच चर्चा होत असे. त्यामुळे या योजनांचा मी साक्षीदार राहिलो आहे. त्यांनी नागपूर जवळ बुटीबोरीला जागा घेऊन तिथे राष्ट्रीय प्रसारासाठी एक केंद्र उभे केले.नागपुरातही दूरदर्शन केंद्र त्यांच्याचमुळे सुरू झाले.१५ ऑगस्ट १९८२ ला देशात राष्ट्रीय प्रसारण सुरू झाले.तोपर्यंत देशात ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता.त्या दिवशी प्रथमच रंगीत प्रक्षेपण सुरू झाले. देशात कलर टीव्ही आणि राष्ट्रीय प्रसारण सुरू करणारे बापूसाहेब हेच प्रमुख सूत्रधार होते. त्यावेळी त्यांना हा प्रकल्प राबवण्यासाठी योजना आयोगाचा विरोध होता.मात्र बापूंनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांना गाठले आणि आपली योजना समजावून सांगितली. त्याच वर्षी देशात आशियाई खेळ होणार होते. त्या पार्श्वभूमीवर रंगीत टीव्ही आणि थेट राष्ट्रीय प्रक्षेपण किती महत्त्वाचे आहे हे इंदिरा गांधींना पटवून देण्यात ते यशस्वी झाले, आणि योजना आयोगाचा विरोध मोडून काढत त्यांनी आपली योजना राबवली.

सुमारे अडीच वर्ष माहिती आणि प्रसारण मंत्री राहिल्यावर नंतर बापूंकडे केमिकल अँड फर्टीलायझर हे खाते आले.त्यावेळी देशातील औषधी निर्माण व्यवसायाला नवी चालना कशी देता येईल तसेच उर्वरक उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते.

इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले.त्यावेळी इंदिरा गांधी गेल्या नंतर कोणीतरी ज्येष्ठ मंत्री पंतप्रधान केला जाईल असा अंदाज होता. मात्र अचानक साधे खासदार असलेल्या राजीव गांधींचे नाव पुढे आले आणि त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.नंतर बातम्या बाहेर आल्या की घटनेतील तरतुदीनुसार राजीव गांधींना राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी शपथ देण्यात काहीही गैर नाही हे आपल्या घटनेतील अभ्यासाच्या आधारे बापूंनीच ग्यानीजींना जाऊन पटवून दिले होते.त्यामुळेच ग्यानीजी शपथ द्यायला तयार झाले होते.

राजीव गांधीच्या मंत्रिमंडळात बापू आधी कोळसा पोलाद आणि खाण मंत्रालयाचे मंत्री झाले होते. मात्र थोड्याच दिवसात ते ऊर्जा खात्याचे मंत्री बनले.ऊर्जामंत्री म्हणूनही त्यांनी नवे नवे प्रयोग करत देशात विजेचे उत्पादन कसे वाढवता येईल या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले होते.

१९८९ मध्ये राजीव गांधींचे मंत्रिमंडळ गेले. देशात जनता दलाचे सरकार आले. त्यावेळी बापू विरोधी पक्षात होते.विरोधी पक्षातील एक प्रभावी खासदार म्हणून त्यांची अवघी दीड वर्षाची कारकीर्द प्रचंड गाजली. १९९१ मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये बापू पुन्हा एकदा वर्धा मतदार संघातून निवडणुकीला उभे राहिले.त्यावेळी मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना पराभूत करण्यासाठी जे कोणी कारणीभूत ठरले होते त्यांना बापुंनी नंतर उदार अंतःकरणाने माफ केले होते. त्यावेळी पी.व्ही.नरसिंहराव यांचे सरकार सत्तेत आले.

नरसिंहराव यांनी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेचे अध्यक्ष म्हणून बापूंची नियुक्ती केली.बापूंनी देशातील कला क्षेत्राला परदेशात नेऊन संस्कृतिक संबंध कसे सुधारता येतील यासाठी अथक प्रयत्न केले.१९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बापूंना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.अर्थात त्यावेळी भारतीय जनता पक्षाची चांगलीच हवा होती त्यामुळेच बापू पराभूत झाले.त्यानंतर मात्र बापूंनी कोणतीच निवडणूक लढवली नाही.

निवडणुकीच्या राजकारणातून बापू बाजूला झाले असले तरी एक राजकीय विचारवंत म्हणून त्यांचे काम सुरूच होते.मंत्री असतानाच त्यांनी भारतात अमेरिकेच्या धर्तीवर अध्यक्षीय प्रणाली कशी फायदेशीर राहील आणि विकासाच्या दृष्टीने कशी पावले टाकता येतील यावर अभ्यास केला होता. त्यांचे या विषयावर एक पुस्तकही प्रकाशित झाले होते. नंतर मला आठवते १९९८ च्या दरम्यान त्यांनी टॅक्स विदाऊट टीयर्स ही संकल्पना मांडली होती.यात आजची आयकर प्रणाली बदलून सोपी सुलभ आयकर प्रणाली लागू करण्यावर त्यांनी भर दिला होता.

त्यांच्या मते कर उत्पन्नावर न लावता खर्चावर लावला तर लोक सुलभपणे कर भरतील आणि आज जी आयकर चुकवण्याची पद्धत बोकाळली आहे तिला आळा बसून होय मी करदाता आहे हे सामान्य माणूस अभिमानाने सांगेल.मी पॅन कार्डधारक आहे हे प्रत्येकाने अभिमानाने सांगावे ही बापूंची संकल्पना होती. त्यासाठी त्यांनी टॅक्स विदाऊट टीयर्स हे पुस्तकही प्रकाशित केले होते.

राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर बापूंनी अभ्यास करून एकूण आठ पुस्तके लिहिली. ती सर्वच पुस्तके बरीच गाजली होती मला आठवते एकदा त्यांनी आपल्या वेदशास्त्रा तील नोंदी आणि कुराणातील आयत्यांमधील नोंदी यांचा तुलनात्मक अभ्यास करून सामाजिक समरसता कशी प्रस्थापित करता येईल यावर आपली मते मांडली होती. त्या विषयावर त्यांनी बरेच लेखनही केले होते. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झाल्यावर बापूंचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घेतले जात होते.मात्र पक्षीय राजकारणातून त्यांच्यासारख्या राजकीय विचारवंताला कायम डावलले गेले.

शाळेत सोबत शिकणाऱ्या मित्राचे वडील ते मी काम करत असलेल्या खात्याचे मंत्री आणि मी पत्रकारितेत आल्यावर एक राजकीय विचारवंत या विविध टप्प्यावर माझे बापूंचे संबंध आले. सुरुवातीला काहीसे औपचारिक असलेले संबंध बापूंच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावामुळे केव्हा कौटुंबिक झाले ते कळलेच नाही. त्यामुळे एक कौटुंबिक स्नेही म्हणून त्यांचा माझा अखेरपर्यंत स्नेहबंध राहिला.

स्वतंत्र विदर्भासाठी बापू अखेरपर्यंत धडपडत होते.मला आठवते २००९ मध्ये त्यांचा नातू निखिल बोधनकरच्या लग्नासाठी ते नागपूरला आले होते. लग्नानंतर एक दिवस त्यांनी सर्व जुन्या नव्या विदर्भवादी मित्रांना घरी बोलावले होते आणि हा लढा पुढे कसा नेता येईल यावर चर्चाही केली होती. मात्र त्यांचे ते स्वप्न अधुरेच राहिले.२३ सप्टेंबर २०११ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी बापूंनी इहलोकीची यात्रा संपवली.

आज बापू असते तर ते शंभर वर्षाचे झाले असते. ते एक यशस्वी विधीज्ञ एक यशस्वी कामगार नेता,एक कुशल राजकारणी, एक राजकीय विचारवंत आणि एक रसिक माणूस म्हणून शेवटपर्यंत आयुष्यात जगले. या काळात त्यांनी वयाचा विचार न करता सर्वच क्षेत्रातील असंख्य लोकांशी मैत्री जोडली.काँग्रेसला कट्टर विरोध करणाऱ्या भाजपमध्ये असलेल्या सुमित्रा महाजनांना बापूंनी आपली बहीणच मानले होते तर भाजपचेच नागपूरकर नितीन गडकरी यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले होते. आजही त्यांना चाहणारा फार मोठा वर्ग राजकीय क्षेत्रासह समाजात आहे.मला वाटते हीच त्यांची कमाई आहे.

कै.बापूंच्या पुण्यपावन स्मृतीला माझे विनम्र अभिवादन

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार,मुंबई व्हाटसअप – ९७६८४२५७५७


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading