स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युग पुरुष व उत्तम प्रशासक, महिला सन्मानाचे रक्षणकर्ते होते- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार

लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात

आग्रा,दि.19 : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीना बाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या अनोख्या महोत्सवाच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. यावेळी केंद्रीय मंत्री एस पी बघेल,उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे , सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, , फतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चहर, आग्र्याच्या महापौर हेमलता कुशवाह, आग्रा जिल्हा पंचायत अध्यक्षा डॉ.मंजू भदौरिया, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,आमदार परिणय फुके यांच्यासह छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल, या चित्रपटाचे निर्माते नितीन विजन, कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते.

आग्रा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आग्रा येथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे केले. परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिली, स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते उत्तम प्रशासक, महिलांच्या सन्मानाचे रक्षणकर्ते होते. महाराष्ट्राचे समाजभान महाराजांनी जागे केले. समाजातील विविध छोट्या घटकांना, बारा बलुतेदार जातीसमूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले. जे देव, देश आणि धर्मासाठी निष्ठेने लढल्याने जगात आदर्शवत असे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. देशाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य आणि जाज्वल्य इतिहास समोर आणल्याबद्दल छावा चित्रपटाचे निर्माते अभिनंदनास पात्र असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबऱ्या वाचून आपण प्रभावित झाल्याचे सांगून केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले, या उपक्रमामुळे राष्ट्रभावना निर्माण होण्यास मोठी मदत होईल .महाराजांच्या शौर्य आणि धाडसामुळे या पुढील काळात आग्रा हे शिवाजी महाराजांच्या नावानेही ओळखले जाईल.तसेच मुंबई -आग्रा हा महामार्ग या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पाठबळातून हा अनोखा कार्यक्रम साकारण्याचे सांगून मंत्री आशिष शेलार म्हणाले, महाराजांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर महानाट्य तयार होऊ शकते इतके ते प्रेरणादायी आहे.आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतलेला दिवस हा युक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

योगेंद्र उपाध्याय यावेळी म्हणाले,आग्रा येथे महाराजांना कैदेत ठेवलेली जागा निश्चित करण्यासाठी अनेक इतिहासकारांशी विचार विमर्श केला.त्यातून रामसिंगची कोठी असलेली जागा निष्पन्न झाली. या जागेवर महाराजांचे भव्य स्मारक व्हावे. आग्रा येथे आयोजित जन्मोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून अभिनेते विकी कौशल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर एक विचारधारा व वैश्विक प्रेरणा आहे. आघाडीवर राहून नेतृत्व करणारे ते अत्यंत द्रष्टे नेते होते. समकालिन राजांपेक्षा महाराज वेगळे होते.ते माझे सुपर हिरो आहेत.छावा चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचा विचार जगात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.विजन म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले.आमदार परिणय फुके यांनी आभार मानले. प्रारंभी महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.शिवजन्मोत्सवा निमित्त पाळणा पूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेच्या प्रसंगावर आधारित नाट्याचेही सादरीकरण झाले. कोल्हापूर येथील पथकाकडून महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा दर्शवणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात दाखवण्यात आली

कार्यक्रमापूर्वी येथील महिला भगिनींनी औक्षण करत मुख्यमंत्र्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. या अनोख्या स्नेहपूर्ण स्वागताने मुख्यमंत्री भारावले. तसेच या कार्यक्रमा दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या चैतन्य तुपे या मुलाने व त्याच्या आई- वडीलांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या सुटकेसाठी तत्परतेने प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading