मंगळवेढ्यातील पुरवठा विभाग ऑक्सिजनवर, नागरिकांमधून होतोय तीव्र संताप

मंगळवेढ्यातील पुरवठा विभाग ऑक्सिजनवर , नागरिकांमधून होतोय तीव्र संताप

जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून पुरवठा विभाग पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी..

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/०२५ – मंगळवेढा तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग कर्मचार्‍याअभावी सलाईनवर असून याचा फटका रेशनकार्डाबाबत विविध कामे घेवून येणार्‍या नागरिकांना बसत असल्याने पुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत गेल्या पंधरा दिवसापासून प्रचंड तक्रारी वाढल्या आहेत.परिणामी प्रत्येक कुटुंबाला लागणारे रेशनकार्ड मिळणे आता दुरापास्त झाल्याने नागरिक थेट या तक्रारी लोकप्रतिनिधीकडे मांडून सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी याकामी गांभिर्यपूर्वक लक्ष घालून येथील पुरवठा विभाग सुरळीत करून नागरिकांची थांबलेली कामे पूर्ण करून द्यावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मंगळवेढा तहसील कार्यालयात वरील मजल्यावर पुरवठा विभाग असून येथे पुर्वी काम करणार्या खाजगी मुलांची संख्या जास्त असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लुट होत होती.एक रेशन कार्ड काढून देण्यासाठी जवळपास तीन ते पाच हजार रुपयापर्यंतचा रेट गेल्याच्या तक्रारी होत्या. सध्या या कार्यालयात एक शासकिय महिला कार्यरत असून या महिलेवर संपूर्ण पुरवठा विभागाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.खाजगी मुले मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट करीत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर येथील अधिकार्‍यांनी त्यांना तेथे येण्यास बंद करून कार्यालयाला कुलूप लावून सर्व कामकाज खालच्या हॉलमध्ये सुरु केले आहे. येथील पुरवठा निरिक्षक बदलून गेल्याने हे पद अद्यापही रिक्तच आहे. पाठीमागे विदर्भातील एका महिलेचा आदेश पुरवठा विभागात झाला होता.मात्र येथील परिस्थिती पाहून त्या महिलेने कार्यभार न स्विकारताच आल्या पावलांनी माघारी निघून जाणे पसंत केले. येथे कर्मचार्‍यांची संख्याही खूपच अपुरी आहे.सध्या एक महिला कार्यरत असून ही महिला येथील कामाच्या तणावामुळे सातत्याने आजारी पडत असल्यामुळे येथील कार्यालय चक्क ऑक्सिजनवर असल्याच्या नागरिक भावना व्यक्त करीत आहेत.

रेशनकार्ड हे प्रत्येक कुटुंबाशी निगडीत असल्यामुळे कामाचा ताण मोठा आहे.अनेक कार्डधारकांच्या धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.मोलमजुरी करणारे,भूमिहीन,भटके अशा लोकांनी धान्य मिळावे या मागणीसाठी गेल्या सहा महिन्या पुर्वी अर्ज केले आहेत. मात्र या अर्जाची अद्यापही दखल घेतली गेली नसल्यामुळे कार्डधारकांना पुरवठा विभागाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.या पुरवठा विभागावर अंकुश कोणाचाच राहिला नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.

धान्य मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी आता लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाकडे धाव घेवून धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत.शहरातील पुरवठा विभाग गेल्या पंधरा दिवसापासून बंद केल्याने पुरवठा विभागाचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. सामान्य जनतेची कामे बंद असल्याने हेळसांड होत आहे.खाजगी ऑनलाईन केंद्रात भरमसाठ पैशाची मागणी केली जात असल्याने नागरिक तिकडे जाण्यास धावत नाहीत.पुरवठा विभाग पुर्ववत करून होणारी जनतेचे हाल थांबविण्यात यावेत अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांचेकडे दादासाहेब बेंद्रे यांनी केली आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading