राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

पुणे/जिमाका : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे.

वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजूला एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस, वाहतुकीस तसेच स्वतःजवळ बाळगण्यास प्रतिबंधित असलेल्या उच्च प्रतीचे विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने पुरवठा करणार असल्याची माहिती भरारी पथक क्रमांक १ ला मिळाली त्यानुसार याठिकाणी राजकुमार उदानारायण उपाध्याय यांच्या बॅगमधून ७५० मिली क्षमतेच्या विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्याच्या एकूण ११ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडून चौकशीअंती मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे दिपेशकुमार विजयकुमार सहा हा राहत असलेल्या धनश्री आशियाना सोसायटी ए विंग फ्लॅट नं. ७०१ मोहम्मदवाडी येथे छापा टाकला असता राज्यात विक्रीस, स्वतः जवळ बाळगणे तसेच वाहतूक करण्यास प्रतिबंधीत असलेल्या उच्चप्रतीच्या विदेशी मद्याच्या ७००/७५० मिली क्षमतेच्या विविध ब्रँडच्या एकूण १२८ सिलंबद बाटल्या जप्त करण्यात आल्या. दोन्ही कारवाईत मद्य वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅग्ज, मोबाईल जप्त करून ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक दिनेश सूर्यवंशी,पी.ए.कोकरे,सहायक दुय्यम निरीक्षक साबळे,जवान अहमद शेख, चंद्रकांत नाईक, भरत नेमाडे, अक्षदा कड, अमर कांबळे, विजय भानवसे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिनेश सूर्यवंशी करीत आहेत.

अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच साठवणुकीबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाशी संपर्क साधावा,असे आवाहन निरीक्षक श्री.पोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading