शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष बैठकीची गरज तसेच GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर डॉ.नीलम गोऱ्हे यांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

जनतेच्या मजबूत जनादेशामुळे बैठकीची होती उत्सुकता
यावेळी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जनतेने दिलेल्या स्पष्ट जनादेशामुळे आम्ही या बैठकीची वाट पाहत होतो.या बैठकीत प्रलंबित प्रश्न,आदिवासी आणि सामाजिक न्याय विषयक उपाययोजना तसेच राज्य आणि जिल्ह्याशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेवर भर
गॅस्ट्रोएन्टेरायटिस (GBS) आणि पाण्याच्या शुद्धतेच्या मुद्द्यावर नागरिकांनी जागरूक राहण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आवाहन केले.पाणी उकळून ते व्यवस्थित थंड करूनच वापरणे गरजेचे आहे.पिण्याच्या पाण्याचे नळ आणि गटार वाहिन्या एकत्र आल्याने पाणी अशुद्ध होण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या भागात अशा घटना घडत आहेत का,यावर लक्ष ठेवावे,असे त्यांनी सांगितले.
शिक्षणाच्या दर्जावर चर्चा,असर अहवालचा आढावा
डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली.मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत असर संस्थेच्या अहवालात अनेक उणिवा दाखवल्या आहेत.आम्ही हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला आणि इतर सदस्यांनीही त्यावर चर्चा केली.पुणे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आम्ही केली.त्याला पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी आणि सामाजिक न्याय योजनांवर स्वतंत्र बैठक
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे मेट्रो प्रकल्प आणि आदिवासी कल्याण योजनांवर लवकरच स्वतंत्र बैठक होणार असल्याचे जाहीर केले.
या बैठकीत सदस्यांनी महानगरपालिका रुग्णालयांमध्ये बाहेरून औषधं लिहून देण्याच्या समस्येवर आवाज उठवला.
कमला नेहरू हॉस्पिटलसारख्या ठिकाणी ही समस्या जाणवते हा मुद्दा सर्व सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचवला आहे, असे त्यांनी सांगितले.
विकास आराखड्याला सकारात्मक प्रतिसाद
पुणे जिल्ह्यातील विकास आराखड्याला पालकमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शिक्षण,आरोग्य, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय योजनांसाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या जातील हे स्वागतार्ह आहे ,असेही डॉ.गोऱ्हे यांनी शेवटी बोलताना नमूद केले.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
