माघी यात्रा कालावधीत भाविकांच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे
पंढरपूर,दि.27:- माघ शुध्द एकादशी शनिवार दि.08 फेब्रुवारी 2025 रोजी असून, या यात्रेचा कालावधी 03 ते 12 फेब्रुवारी असा आहे.या यात्रा कालावधीत श्री.विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य,स्वछतेला प्राधान्य देवून आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी सोपविलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या .

माघ वारी पुर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश सुडके, मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, नायब तहसिलदार बालाजी पुदलवाड,न.पा चे अभियंता नेताजी पवार, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.भोळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले की, यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुध्द व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी,65 एकर व व नदीपात्रात तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे.65 एकरमध्ये भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसा वीजपुरवठा आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत.आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा.नदी पात्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील याबाबत पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. मंदिरालगत विक्रीसाठी बसणाऱ्या पथविक्रेत्यांवर मंदिर, पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमावीत अशा सूचनाही प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या.

मंदीर समितीच्यावतीने पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच दि. 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाष्टा व भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.
यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी सांगितले.
यावेळी नगरपालिका प्रशासनाकडून वारी कालावधीत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा, स्वच्छता, तात्पुरते शौचालय, कचरा व्यवस्थापन, जंतनाशक फवारणी आदी बाबबतची माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली.
यावेळी अन्न-औषध प्रशासन, परिवहन, महावितरण,आरोग्य आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
