जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत कलम 37 (1)(3) लागू
परभणी,दि.21(जिमाका): जिल्ह्यात आगामी काळातील महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी आहे. तसेच मराठा समाजाची आरक्षणाची मागणीसाठी विविध आंदोलनाचे स्वरुप पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने दि.16 ते 31 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) लागू करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) नुसार प्राप्त अधिकारान्वये शांतता व सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यां व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्तीस परभणी जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या आसपास शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, (ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे यासह इतर बाबींवर मनाई आदेश लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी कळविले आहे.
कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर कोणतेही शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाहीत. मिरवणूक, कार्यक्रमाबाबत परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक परभणी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले इतर पोलीस अधिकारी यांना राहतील हे आदेश परभणी जिल्ह्यासाठी लागू राहतील, असेही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेशात म्हटले आहे.
Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
