रुकडी कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था,पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

रुकडी येथील कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे

अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पंचकल्याणिक पुजेबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाला सूचना

कोल्हापूर,दि.14 : अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान आदिनाथ तीर्थकरांचे भव्य पंचकल्याणिक पूजा होणार आहे. कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. या पुजेकरिता आचार्य विशुद्धसागर मुनी महाराज सहसंघ, बाहुबली महाराजांचे संघातील सर्व त्यागी त्यांसोबतच देशातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने श्रावक श्राविका येणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.ही बैठकीत खासदार धैर्यशील माने तसेच आमदार अशोक माने यांच्या उपस्थितीमध्ये नियोजन करण्यात आले. नुकताच नांदणी येथे अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला होता. त्या ठिकाणी आयोजकांनी केलेल्या नियोजनानुसार प्रशासना कडून त्या ठिकाणी गर्दीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या घटकासाठी पाठबळ देण्यात आले होते. त्याचप्रकारे रुकडी येथेही होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागांना वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या. यावेळी महसूल,पोलीस, ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम,एसटी महामंडळ,केएमटी, महावितरण,आरोग्य विभाग अशा आस्थापनांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

येणाऱ्या गर्दीची संख्या लक्षात घेता कार्यक्रमादरम्यान प्रशासनाने त्या भागातील सर्व पाण्याच्या स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण करावे.वाहनांची गर्दी न होता चांगल्या प्रकारे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील अशा पद्धतीने नियोजन करावे. महत्त्वाचे व्यक्ती, भाविक यांना येण्या जाण्यासाठी रस्त्यांवरती दिशादर्शक फलकांसह आवश्यक सुविधा उभाराव्यात.फिरते शौचालय पुरवठा, तात्पुरत्या वीज जोडणीची व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील संबंधित आस्थापना यांनी करावयाचे नियोजन इ.बाबत संबंधित विभागांनी आयोजकांशी संपर्क ठेवून त्यांच्या कामकाजास सहकार्य करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. आरोग्य विभागाने गर्दीची संख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी आरोग्य सेवा द्यावी.यासाठी नायब तहसीलदार व तालुक्याचे एक विस्तार अधिकारी यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पाहावे असे निर्देश देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण दिल्याचे सांगितले.यानुसार त्यांनी प्रशासनाला आवश्यक सहाय्य मिळावे यासाठी सूचना केल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यक्रम स्थळापासून जवळच्या अंतरावर हेलीपॅड उभारणी बाबतची व्यवस्था पहावी तसेच कार्यक्रमाठिकाणी येणारे रस्ते चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्थेसह चांगल्या आरोग्य सुविधा तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी संबंधित विभागांनी चांगल्या प्रकारे नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीत सांगितले. यावेळी खासदार धर्यशील माने यांच्या हस्ते कार्यक्रमाचे निमंत्रण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प.पू. आचार्यरत्न 108 बाहुबलीजी महाराज सेवा समिती रूकडी व समस्त जैन समाज रूकडी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading