इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

इचलकरंजीतील पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पत्रकारांसाठी मोलाचे वक्तव्य

इचलकरंजी शहराच्या प्रगती करिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास…

कोल्हापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६/०१/२०२५: सोमवार दि.६ जानेवारी २०२५ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ,रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना नेत्या तथा विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या.त्याचबरोबर इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी यावेळी प्रमुख उपस्थितीत होते.

याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,इचलकरंजी शहर कला, क्रीडा,राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून या शहराला भारताचे मँचेस्टर असे संबोधले जाते, हे या शहराने औद्योगिक क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त सर्व विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यापुढेही इचलकरंजी शहरातून अनेक व्यक्ती जे क्रीडा, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात निपुण आहेत ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर शहर व जिल्ह्याचा नावलौकिक करतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण प्रगतीकरिता शासन कटिबद्ध असून वेळ पडल्यास अस्तित्वात असलेले कायदे व नियमात बदल केले जातील तसेच जीएसटी परताव्याच्या थकबाकीचा विषय असो अथवा इतर कोणताही कायदेशीर विषय असो त्याकरिता गरज पडल्यास नवीन अध्यादेश काढण्यास शासन कचरणार नाही,असेही डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

आज पत्रकार दिनानिमित्त जो पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे याचे त्यांनी कौतुक केले तसेच लोकशाही मध्ये पत्रकारिता व पत्रकार हा स्वतंत्र चौथा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले.

पुढे बोलताना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,मी जवळजवळ २२ वर्ष आमदार आहे तेव्हापासून पाहते की, दरवर्षी इचलकरंजीत पाणी दूषित झाल्यामुळे लोक आजारी पडले आहेत याच्या बातम्या समाजमाध्यमात सतत प्रसारित होत असतात.याबाबतीत अनेकवेळा विधि मंडळात चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही बाब इचलकरंजीकरांना भूषणावह नाही. सबब सदरची परिस्थिती बदलण्याकरिता राज्यशासन तर निश्चितपणे प्रयत्न करेलच परंतु या कामी आपणा सर्वांचे सहकार्य सुद्धा अपेक्षित आहे.

पत्रकारांसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की,पत्रकारांसाठी नवीन निवासी संकुलांची उभारणी करणे अथवा अस्तित्वात असलेल्या निवासी संकुलांचा पुनर्विकास करणे व या संकुलामध्ये पत्रकारांचा समावेश करणे हे शासनाच्या ध्येयधोरणात अंतर्भूत असून, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करेन.त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांसाठी पेन्शनबाबत एक सुटसुटीत नियमावली तयार केली जावी याकरिता सर्व पत्रकार बंधूंनी वित्त विभागाशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे व योग्य ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन कशी मिळेल याकरिता सर्व पर्यायांची खातरजमा करावी.सर्व वृत्तसमूहांनी आपल्या कडील ज्येष्ठ पत्रकारांची यादी शासनाकडे सादर करावी जेणेकरून पत्रकारांना पेन्शन मिळणे व त्यांची शासन स्तरावर ओळख होणे सोपे जाईल.यासर्व बाबींवर मी स्वतः शासन व्यवस्थेतील सर्व संबंधित अधिकारी व पत्रकारांचे प्रतिनिधी यांच्यासोबत लवकरच एक बैठक घेईन.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading