वाळू चोरी व पर्यावरणाचा र्हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद
न्यायालयाने सुनावली शिक्षा
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- ब्रम्हपुरी येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून पर्यावरणास हानी पोहोचणे व वाळू चोरी प्रकरणी मंगळवेढा न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एन.गंगवाल-शहा यांनी ट्रॅक्टर चालक कालिदास दत्तात्रय पाटील रा.ब्रम्हपुरी याला दोषी धरून वाळू चोरी प्रकरणी तीन वर्षे साधी कैद व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची माहिती अशी की,यातील आरोपी ट्रॅक्टर चालक कालिदास दत्तात्रय पाटील रा.ब्रम्हपुरी याने दि.9 /5/2018 रोजी दुपारी 2.30 च्या दरम्यान ब्रम्हपुरी येथील भिमा नदीच्या पात्रातून एम एच 45,ए डी 0948 या ट्रॅक्टरमध्ये 7 हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू उपसा करून पर्यावरणास र्हास होईल असे कृत्य करून वाळू चोरून घेवून जाताना फिर्यादी तलाठी दिगंबर मोरे यांना मिळून आल्यावर त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक फौजदार एम.बी. जमादार यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये साक्षीदार म्हणून बोराळचे तत्कालीन तलाठी विनोद बनसोडे व पंच म्हणून अमीर मुजावर आदींच्या साक्षी पूर्ण झाल्या.यामध्ये ब्रम्हपुरीचे तत्कालीन तलाठी तथा फिर्यादी दिगंबर मोरे व तलाठी विनोद बनसोडे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड.धनंजय बनसोडे यांनी बाजू मांडली. यामध्ये वाळू उपशामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून याचा निसर्गावर परिणाम होत आहे.अवैध वाळू उपसामधून मिळणार्या काळ्या पैशामुळे मुजोरी वाढून समाजात अशांतता निर्माण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनतो.त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा ठोठावावी आदी मुद्दे मांडल्याने न्यायाधीश श्रीमती एस.एन. गंगवाल-शहा यांनी आरोपीला वाळू चोरी प्रकरणी तीन वर्षे साधी कैद व तीन हजार रुपये दंड,दंड न भरल्यास पंधरा दिवसाची साधी कैद तर पर्यावरणास हानी पोहोचविल्या प्रकरणी तीन वर्षे साधी कैद व दोन हजार रुपये दंड,दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद या दोन्ही शिक्षा एकत्रीत भोगावयाच्या असल्याचे म्हटले आहे.

Discover more from वृत्त भारती
Subscribe to get the latest posts sent to your email.
