ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल

खोमनाळ ग्रामपंचायतमधील प्रकार…

लक्ष्मी दहिवडी/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहे तसेच बोगस कामेही केली आहेत असे म्हणून एका ग्रामपंचायत अधिकार्‍यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणून पत्नीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पवार,अक्षय इंगोले रा.खोमनाळ या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,यातील फिर्यादी अभिजीत अशोक लाड हे ग्रामपंचायत अधिकारी असून ते दि. 13/10/2023 ते 29/5/2024 या कालावधीत खोमनाळ ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नेमणूकीस होते.सदर नेमणूक कालावधीत ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेल्या विकास कामाबद्दल आरोपी प्रकाश पवार यांनी गटविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी अर्ज केला होता. सदर अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने फिर्यादी अभिजीत लाड यास विस्ताराधिकारी हरीदास नरळे यांनी चौकशीसाठी खोमनाळ ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले होते.

दि.18 डिसेंबर रोजी विस्ताराधिकारी चौकशी करीत असताना 11.30 वा. विस्ताराधिकारी हरीदास नरळे,विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती इंगोले,ग्रामपंचायत कर्मचारी अजीत लंगडे,ग्रामपंचायत ऑपरेटर श्रीमती अयोध्या शिंदे, सरपंच बायडाबाई मदने,ग्रामस्थ बाबासाो बिले,राजेंद्र मदने, निखील सरवदे,अशोक चौंडे,राहुल कसबे यांचेसह आरोपी प्रकाश पवार आदी सर्वजण हजर असताना दुपारी 12.00 वा.आरोपीने तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहेस, बोगस कामे केली आहेत असे म्हणून शिवीगाळी करून फिर्यादीची कॉलर पकडून हाताने मारहाण करून शासकिय कामात अडथळा केला.यावेळी आरडाओरड ऐकून आरोपी अक्षय इंगोले यानेही ग्रामपंचायत कार्यालयात येवून शिवीगाळ केली.तसेच उपस्थित लोकांनी सोडवासोडव केल्यानंतर ते दोघे तेथून निघून जात असताना फिर्यादीस तु आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यास मी सुध्दा तुझ्यावर माझे पत्नीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देवून ते दोघे तेथून निघून गेल्याचे लाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे .याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.


Discover more from वृत्त भारती

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from वृत्त भारती

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading